गणेशोत्सवाच्या धामधोमीत शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याचा भावूक संदेश
विशेष
प्रतिनिधी / ज्येष्ठ बातमीदार
मुंबई:
गणेशोत्सवाचा
आनंद आणि उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात ओसंडून वाहत असताना, कायदा
व सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास तत्पर असणारे पोलीस कर्मचारी आपल्या भावना कशा
व्यक्त करतात,
याचे एक अत्यंत जिवंत आणि भावूक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
मुलुंड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्री नारायण निवृत्ती गाडेकर यांनी बाप्पावर
रचलेली 'मला काय नको...' ही कविता सध्या सामाजिक माध्यमांवर आणि नागरिकांमध्ये
चांगलीच चर्चेत आली आहे.
दिवस-रात्र
रस्त्यावर, चौकात उभे राहून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने
गणपती बाप्पाच्या माध्यमातून समाजातील अनावश्यक भपकेबाजपणा, चढाओढ, डीजे-लाऊडस्पीकरचा
गोंधळ आणि अवहेलनेवर अत्यंत मार्मिक व संवेदनशील भाष्य केले आहे.
"मला
काय नको..." (कवितेतील काही महत्त्वाच्या ओळी)
"काल माझ्या स्वप्नात बाप्पा आले,
बोलता
बोलता कान टोचून गेले...
बोलले
- आमचे मंडळ मोठे की तुमचे,
अशी कशाला
चढाओढ करता?
सगळ्यांनाच
मूर्ती मोठी पाहिजे,
असा नको
तो हट्ट कशाला रे धरता!
नको तो
लाऊडस्पीकर, नको तो डीजे,
नको रे
ढोल ताशा...
नुसती
उगाच डांगडिंग,
कशाला
पाहिजे फुकटचा तमाशा!
वाटल्यास
सांस्कृतिक कार्यक्रम,
प्रवचन, भजन, कीर्तन
ठेवा...
माझ्या
लाडक्या भक्तांनो,
मला काय नको,
फक्त
मनात स्वच्छ,
निर्मळ भाव हवा!"
समानता, सामाजिक
भान आणि पोलीस दलाचे आवाहन
गाडेकर
यांनी कवितेत पुढे नमूद केले आहे की, बाप्पाच्या दरबारात श्रीमंत आणि गरीब असा
कोणताही भेदभाव नसतो; तेथे सर्वांना समान आदराचे स्थान असते. परंतु मानवाने
'व्हीआयपी'
आणि 'सामान्य' असा भेद निर्माण केला आहे. बाप्पा
हा समता, एकता आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा असून तो चराचरात वास करतो.
गणेशोत्सवाच्या
काळात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्ते व चौकात वेळे-अवेळेची तमा न बाळगता उभे राहून
सेवा बजावतात. नागरिकांनी सण-उत्सव आनंदाने साजरे करतानाच कायद्याच्या चौकटीत राहून
पोलिसांना सहकार्य करावे आणि भपकेबाजपणाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांची कास धरावी, असे कळकळीचे
आवाहन हेड कॉन्स्टेबल नारायण गाडेकर यांनी आपल्या कवितेतून केले आहे.