Saturday, May 11, 2024

भाजपकडून केली जाते मुलुंडकरांची फसवणुक मुलुंडमध्येच होणार धारावीकरांचे पुनर्वसन मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या करतात मतदारांची दिशाभूल


मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणा-या बांग्लादेशी नागरिकांना ईशान्य मुंबईत होणा-या पीएपी प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचा घाट महायुतीच्या सरकारने घातला आहे. असे असतानाही किरीट सोमय्या व लोकसभेचे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करत आहे. असा आरोप अँड. सागर देवरे यांनी केला आहे.

 

अलिकडेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक बांग्लादेशींची यादी दाखवत पीएपी प्रकल्पामध्ये एकाही बांग्लादेशी नागरिकाला येऊ देणार नाही अशी भुमिका जाहीर केली होती. मात्र किरीट सोमय्या व भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे खोटी माहिती देऊन ईशान्य मुंबईतील मतदारांची दिशाभुल करीत आहेत. असे सांगत मुळात भारतात बांग्लादेशी नागरिक आलेच कसे या बांग्लादेशी नागरिकांचे ईशान्य मुंबईतील पीएपी प्रकल्पात पुनर्वसन कोणत्या कायद्याच्या आधारे करणार आहे. हे महायुतीच्या सरकारने सांगावे, असा सवाल अँड.सागर देवरे यांनी उपस्थित केला आहे.

 

मनपा आयुक्तांना पीएपी प्रकल्प मंजुर करण्याचे अधिकार नगर विकास खात्याने 11 जानेवारी 2022 रोजी एक अधिसुचनेव्दारे काढली. त्यात नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुन 2022 मध्ये सरकार बदलले व मुलुंड मधील पीएपी प्रकल्पाला जुन 2023 मध्ये पहिल्या पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2022 फेब्रुवारी व 2024 ला पीएपी प्रकल्पाला महायुती सरकारने अंतिम मंजुरी दिली. मग यावेळी किरीट सोमय्या व मिहिर कोटेचा यांनी अंतिम अधिसुचनेला विरोध का केला नाही असा सवालही अँड. सागर देवरे यांनी केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभुल करण्यासाठी मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या पीएपी प्रकल्पाला विरोध असल्याचे नाटक करीत आहेत. अशी घणाघात टीका अँड. सागर देवरे यांनी केली आहे.

 

तसेच धारावी पुनर्वसनच्या बाबतही मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या  हे ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक निवडणुकीच्या तोंडावर करीत आहे. अलिकडेच धारावी पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेची डम्पिंग ग्राऊडची 41.6 एकर जागा सरकारला देण्यात आलेली नाही. अशी खोटी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तथापी मुलुंड मधील जकात नाका याची 18 एकर व त्या बाजुची 46 एकर जागा मनपाच्या मालकीची असून राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई मनपाकडे पत्राव्दारे मागितली आहे. त्यापैकी जकात नाक्याची 18 एकर जागा राज्य सरकारला देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबत मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र हि बाब किरीट सोमय्या यांनी मतदारांपासून लपवुन ठेवली असा आरोप अँड. देवरे यांनी केला आहे. तसेच क्रेंद्र सरकारकडे राज्य शासनाने मिठागरांची जागा देण्याची मागणी केली आहे. असे असतांनाही किरीट सोमय्या यांनी मिठागरांच्या जागेवर होणा-या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत काहीही बोलत नाही.

 

या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारावी पुनर्वसनासाठी मुलुंड मधील एकही स्केवर फिट जागा दिलेली नाही असे बेजबाबदार वक्तव्य करणारे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे आता कोणत्या तोंडाने धारावी पुनर्वसन पीएपी प्रकल्पाला विरोध करीत आहे. असा सवालही अँड. सागर देवरे यांनी उपस्थित केला. ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करणारे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांना मुलुंड मधील मतदार जागा दाखवुन देतील. असा विश्वास अँड. सागर देवरे यांनी व्यक्त केला.

Popular Posts