Saturday, March 28, 2009

ईशान्य मुंबई मतदारसंघ
ईशान्य मुंबई मतदारसंघातील चौरंगी लढतीत
सेना-कॉंग्रेसच्या मतदारांचा कौल निकाल ठरविणार?


यंदाच्या पंधराव्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील एकूण सहा मतदारसंघात ईशान्य मुंबई मतदारसंघ हा नेहमिच चर्चेत राहीलेला आहे.याचे कारण सदर मतदारसंघाचे आजवर लागलेले निकाल होय.यंदाच्या निवडणूकीत देखील याच निकालाची पुनर्रावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे ह्यावेळेस सदर मतदारसंघात मनसेचे शिशिर शिंदे, भाजपाचे किरिट सोमय्या, राष्ट्रवादीचे संजय पाटिल आणि बसपाचे अशोक सिंह यांच्यात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र भाजपाची युती सेनेशी तर राष्ट्रवादीची युती कॉंग्रेसशी तुटता-तुटता अखेरच्या क्षणी जुळल्याने ह्या पक्षातील नेत्यांची तसेच त्यांच्या पक्षांच्या मतदारांची मने काही जुळल्याचे दिसलेली नाहीत. याचाचं परिणाम यंदाच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात होणा-या निवडणूकीतील चौरंगी लढतीत होईल. त्यामुळे
सेना-कॉंग्रेसचे मतदार ईशान्य मुंबई मतदारसंघाचा खासदार ठरवतील असा जाणकारांचा होरा आहे.

निकालांचा ईतिहास
सदर ईशान्य मुंबई मतदारसंघात लागलेल्या निकालांचा मागील ईतिहास पाहील्यास इंथ सलगपणे दोनदा कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आलेला ऩाही. मागील पाच निवडणूकांमध्ये कॉंग्रेसचे गुरूदास कामत तीनवेळा तर भाजपाचे स्व.प्रमोद महाजन व किरीट सोमय्या एकदा निवडूण आलेले आहेत. पुर्वी हा मतदारसंघ कुर्ला-ट्रॉम्बे ते मुलुंड असा सुमारे 19 लाख मतदारांची संख्या असलेला मोठ्ठा मतदारसंघ होता. यामध्ये दलित मतदार मोठ्ठ्या प्रमाणात होते त्यामुळे त्यांच्या मतदानाचा कौल हा निर्णायक ठरत असे. उदाहरणार्थ ज्या-ज्या वेळेस ह्या मतदारसंघात दलित उमेदवार उभा केलेला आहे तेव्हां कॉंग्रेस पक्षाचा उमेदवारास फटका बसलेला आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन हे रामदास आठवल्यांच्या उमेदवारींमुळे निवडून आले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या देखील याच फार्मूल्यामुळे निवडूण आले होते. आधीच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे गुरूदास कामतांना मात्र कॉंग्रेस लाटेचाचं फायदा झालेला दिसून आलेला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणूकीत कामत जिंकलेले आहेत. तसेच 2004-2005 च्या काळात झालेल्या निवडणूकीत ह्या मतदारसंघात दलित उमेदवार फॅक्टर कमजोर पडल्यानेच गुरूदास कामत तिस-यांदा निवडूण आलेले आहेत.

खासदार गुरूदास कामतांचे पलायन

चौदाव्या लोकसभेचे कॉंग्रेसचे खासदार गुरूदास कामत यांनी मात्र पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून पलायन केले आहे. सदर मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षास सोडून देण्याचे कारण मतदारसंघाची पुनर्रचना हे नसून कामतांनी ही जाणीवपूर्वक घेतलेली चाल आहे असेही त्याच्यांवर विरोधकांनी आरोप केलेले आहेत. कारण यंदा सर्वच मतदारसंघाची पुनर्रचना केल्याने ईशान्य मुंबई मतदारसंघास देखील त्याचा फटका बसला.याचेच भांडवल खासदार गुरूदास कामतांनी करून येथून माघार घेतल्याचे त्यांच्या पक्षातील विरोधक सांगताहेत.कामतांच्या विरोधकांच्या मते याच मतदारसंघातून कामत तीन वेळा निवडून आल्यावर, त्यांनी त्यांच्या प्रचारकार्यात येथील विकासकामांची यादी जाहीर करून सदर कामांचे श्रेय घेतलेले आहेच. मग नव्याने झालेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात केवळ दोन टक्के मतदार कमी झाल्याने त्यांना निवडून येणार नाही असे का वाटावे? का कामतांनी फक्त निवडूऩ येण्यासाठीच लोकसभेची निवडणूक लढविली होती, मग मतदारसंघातील आजवर झालेल्या विकासकामांचे श्रेय त्यांना घेण्याचा कोणताचं नैतिक अधिकार राहीलेला नाही.असेही विरोधकांचे म्हणणे आहे. यावर खासदार गुरूदास कामत हे विरोधकांनी केलेल्या आरोपांस उत्तर देताना म्हणाले की, कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशांचे मी पालन केलेले आहे.आजमितीस मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवित नाहीय पंरतू पक्षाने सांगितल्यास मी कोठूनही लढण्यास तयार आहे. मात्र सदर मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षास सोडून दिल्याने त्यांच्या उमेदवाराचा प्रचार कॉंग्रेसवाले करणार नाही हा भारतीय जनता पक्षाचा अप्रचार आहे. असेही कामत त्यांना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तरीदेखील सेना-कॉंग्रेसच्या पक्षातील काहीनीं यंदा आपले समर्थक व आपण मिळुन एक वेगऴाच विचार करीत आहोत असे खाजगीत सांगितले.

नविन मतदारसंघ आणि नवी लढाई

निवडणूक आयोगाने पुनर्रचना केलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात मानखूर्दचा काही भाग मिळुन घाटकोपर ते मुलुंड असा सुमारे 15 लाख मतदारसंख्या असलेला नवा मतदारसंघ उभारलेला आहे. सदर मतदारसंघात कॉंग्रेसने आपला मित्रपक्ष राष्ट्रवादीचे संजय पाटिल यांना तर शिवसेनेने भाजपाचे किरिट सोमय्या यांना पाठींबा जाहीर केलेला आहे. बहुजन समाजवादीच्या सर्वेसवा बहन मायावतींनी यंदाच्या पंधराव्या लोकसभेत पंतप्रधानपदी आपली दावेदारी व्यक्त केलेली आहे, याकरीता त्यांनी संपूर्ण देशात बसपाचे उमेदवार उभे करून जास्तीत-जास्त जागा मिळविण्याची चाल खेळलेली आहे. याच खेळीचा एक भाग म्हणून ईशान्य मुंबई मतदारसंघात वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेले अशोक सिंह ह्यांना उभे केलेले आहे. याशिवाय मराठीचा मुद्दा उचलून सा-या देशात रान माजविणा-या मनसेध्याक्ष राज ठाकरे यांचे उजवे हात असलेले शिशिर शिंदे हे प्रथमचं खासदारकीच्या लढाईत उतलेले आहेत. त्यामुळे सदर नव्या ईशान्य मुंबई मतदारसंघात नव्या लढाईचे बिगुल वाजलेले आहे. या चौरंगी अटीतटीच्या निवडणुक लढाईत तसे पहाता ज्या पक्षांचे उमेदवार उभे नाहीत ते व त्यांचे समर्थकचं नवा खासदार निवडुन देण्यात महत्वाचा रोल निभावतील असे सध्यातरी ईशान्य मुंबई मतदारसंघात चित्र समोर आलेले आहे.

असंतूष्टांचा परीणाम

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण ? मागील काही दिवस याबाबत जो घोळ सुरू होता तो अखेर किरिट सोमय्या .यांच्या जाहीर केलेल्या नावांमुळे संपला. असे सध्यातरी मानावयास काहीच हरकत नाहीय.पंरतू हे सारे वरकरणी असल्याचे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे दिसून आले. स्वर्गीय प्रमोद महाजनांची मुलगी पुनम महाजन हीला ईशान्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले होते. पंरतू भाजपाचे नितिन गडकरी यांनी थेट भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे मन वळवून मुंडे यांच्यावर मात केली. याचा परीणाम किरिट सोमय्यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडली पण ही लढाई किती अवघड आहे याचीही भाजपा गटात कुजबुज सुरू झाल्याचे समोर आले आहे. याची झलक गुढीपाडव्याच्या दिवशी पुनम महाजन व मनसेध्याक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे वृत्त चर्चेचा ठरला तेव्हां कळाले. ईशान्य मुंबई मतदारसंघात किरिट सोमय्या यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्यांची व कार्यकर्त्यांची यादी मोठ्ठी आहे. तसेच शिवसेनेतदेखील आहेत. कॉंग्रेस-सेना, राष्ट्रवादी पक्षातही असंतूष्टांचा राबता आहेच. शिवाय मनसेचे शिशिर शिंदे यांनी सेनेत असताना ह्या मतदारसंघात शाखाप्रमुख ते आमदारपदा पर्यंत खूप विधायक सामाजिक तथा राजकीय कार्य केलेले आहे. त्यांचा जनसंर्पकही दांडगा आहे. विशेष म्हणजे सा-याच पक्षातील असंतूष्टाशी त्यांचे अतिशय जवळीक संबंध असल्याने त्याचा राजकीय लाभ त्यांना मिळू शकतो. एकूण काय तर ईशान्य मुंबई मतदारसंघातून यावर्षी सेना-कॉंग्रेसचे मतदार ईशान्य मुंबई मतदारसंघाचा खासदार ठरवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू असल्याने काहीही घडू शकते. पाहूया घोडे- मैदान जवळच आहे.

Popular Posts