Monday, March 25, 2019

भाजपा शिवसेना महायुतीच्या शुभारंभाच्या सभेला विराट जनसागर लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन


Photo Credit to The Asian Age 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा असून पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना महायुतीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा जनतेचा निर्णय झाला आहे. महायुतीच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेसाठी जमलेला लोकांचा महासागर महायुतीचा लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याची ग्वाही देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापूर येथे केले. देव देश धर्मासाठी जनतेच्या इच्छेनुसार शिवसेना भाजपाची युती झाली असून शुभारंभाच्या सभेसाठी झालेल्या गर्दीचे अभूतपूर्व दृश्य हे विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी, शिवेसना, रिपब्लिकन पार्टी (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीची लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा कोल्हापूर येथे झाली. मा. देवेंद्र फडणवीस व मा. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, रयत क्रांतीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री अनंत गीते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरखा. विकास महात्मे, उमेदवार खा. संजयकाका पाटील, संजय मंडलिक व धैर्यशिल माने उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी त्या वेळच्या काँग्रेस आघाडी सरकारने केवळ पाकिस्तानचा निषेध केला. उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत दाखवली आणि सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आणि सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. सेनेच्या पराक्रमाबद्दल विरोधी पक्षांना शंका आहे. विरोधकांची संवेदना भारतीय जनता आणि सैन्यासोबत नाही तर पाकिस्तानसोबत आहे. पण हा मोदीजींच्या नेतृत्वाखालील नवा भारत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.

त्यांनी सांगितले की, देशप्रेमाने भरलेल्या भाजपा शिवसेना महायुतीचा सामना करण्याची विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची हिंमत नाही. त्यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. त्यांचे उमेदवार तिकिटे परत करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राने त्यांना भरभरून दिले पण त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपले खुले आव्हान आहे की, त्यांची पंधरा वर्षांची राजवट आणि महायुतीचे साडेचार वर्षांचे सरकार यांची तुलना करणारी जाहीर चर्चा करावी. पश्चिम महाराष्ट्रासोबत संपूर्ण महाराष्ट्रात युती सरकारने सिंचन, रस्ते यासाठी जास्त काम केले आहे. ऊस शेतकऱ्याला मदत केली आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा महायुती जिंकेलच व त्यासोबत संपूर्ण राज्यात जनता युतीला पाठिंबा देईल.

मा. उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीला विरोध करायला ५६ पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न आहे. मोदींचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे व मुंबईचे प्रश्न आपण मांडले तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली. आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. त्यांनी शब्द दिला व पाळला. आम्ही देव, देश आणि धर्मासाठी युती केली आहे. गरिबांचे भले करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.

दलित समाज, आरक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे, असे आवाहन मा. रामदास आठवले यांनी दलित व बौद्ध समाजाला केले. देशाला सुरक्षित ठेवणारे सरकार देण्यासाठी मा. मोदी यांना पाठिंबा देऊन रासपाचे सर्व सैनिक काम करतील, अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, युतीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची ही सभा विक्रमी झाली आहे. ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा युती जिंकेल.

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

( मकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव

महिलांसाठी सरकारच्या कामामुळे निवडणुकीत भाजपाला अनुकूल वातावरण महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विश्वास




महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अनेक कामांमुळे जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि विश्वास पाठक उपस्थित होते.
मा. पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१४ च्या निवडणूकीत आम्ही तत्कालिन सरकारचे अपयश आणि आम्ही कोणती कामे करणार आहोत या मुद्यांवरून प्रचार केला होता. मात्र, या निवडणूकीत आमच्याकडे आमच्या कामांचा अहवाल आहे. आम्ही केलेली कामेही जनतेसमोर दिसत आहेत. या कामांमुळेच जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने आहे.
त्यांनी सांगितले की, आपण जलसंधारण मंत्री असताना राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू झाले. यावर्षी कमी पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेमुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाईचा सामना करणे सोपे झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत कधीही रस्त्याने न जोडलेली गावे जोडण्यात यश आले. ग्रामपंचायतीत संरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरूण सरपंचाची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शिता आली आहे. ही बदली प्रक्रिया न्यायालयाकडूनही कायम झाली. बचतगटांसाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना, महालक्ष्मी सरस उपक्रम आणि अस्मिता योजना यासारख्या ग्रामीण भागातल्या महिला वर्गाला सक्षम करणाऱ्या योजनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आहे. मा. पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिर्डीत लाखो घरकुलाचं वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्रीया योजनेमुळे राज्यात मुलींच्या जन्मदरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव

Popular Posts