Tuesday, February 23, 2021

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले :

बरेच दिवस आपल्याला भेटलो नाही. आज आपल्या भेटीला येण्याचं कारण कळलं असेलच. कोरोनाव्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनात होतंच. कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला त्याला जवळपास वर्ष होत आलं.तेव्हा मी आपल्याशी संवाद साधत होतो. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हा समाधानाचा क्षण होता.

कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी याची कोणालाच कल्पना नव्हती.औषध तेव्हा ही नव्हतं आजही नाहीए. एक दिलासादायक बातमी म्हणजे आता वॅक्सीन आलंय.व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ९ लाख फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात केलीए.

सुरुवातीला एक गैरसमज होता की वॅक्सिनने काही साईड इफेक्ट्स होतात का? पण सुमारे ९ लाख कोविड योद्ध्यांना लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे घातक साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत. मी जे राहिलेले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतो की कोणतेही किंतु-परंतु ना ठेवता बेधडक लसीकरण करून घ्या.

पुढील एक ते दोन महिन्यात काही कंपन्या आपल्याला लसी देणार आहेत. त्यांचं उत्पादन हळूहळू सुरू होतंय, ट्रायल-चाचण्या सुरू आहेत. जसजसा ते त्यांचा कार्यकाळ व कार्यक्रम पूर्ण करतील तशा आपल्याला लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा जनतेसाठी आपण हा कार्यक्रम खुला करून देऊ.

लस घेण्यापूर्वी व नंतरही आपण मास्क घालायला हवा. हे एक युद्धच आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. अजून आपल्या हातात तलवार नाही. व्हॅस्किन धीम्या गतीने येतयं. पण मास्क हीच ढाल आहे. ही ढाल काढली किंवा घालायला विसरलो, तर हा छुपा शत्रू आहेच. काही वेळेला तो आप्तस्वकीयांच्या माध्यमातून वार करतो.

म्हणून आपल्याला विनंती आहे, की मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेण्याआधी व नंतरही. लग्न-समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आहेत. हॉटेल्स,दुकानं,रेस्तराँच्या वेळा वाढवल्या,लोकल्स सुरू केल्या,मंदिरं उघडली. त्या काळात आपण सूचनांचं तंतोतंत पालन केलं.आताही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे

पण आता झालं काय तर करोना गेला असं वाटायला लागलं. पाश्चिमात्य देशांत असंच झालं. सुरुवातीलाच सांगितलं, की लाट येते, मग खाली जाते, परत वर येते. ती खाली जाते तेव्हाच थांबवायचं. आपण अलीकडे जी शिथिलता अनुभवली ती पाश्चिमात्य देशांतही होती. पण तिकडे अनेक देशांत लॉकडाऊन करावा लागला.

कोणी काहीही म्हणो. संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर संपर्क तोडणे हाच माहीत असलेला मोठा उपाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी करोना गया, कुछ नही अभी असं वातावरण होतं. तेव्हा दोन-अडीच हजार रुग्ण येत होते. खरंच चांगलं वातावरण होतं. पण ते सगळं तुमचं कर्तुत्व होतं आणि योद्ध्यांची अविरत मेहनत.

त्यांनी अहोरात्र काम केलं. कित्येकांनी जीवही गमावले. त्यांनी जे बलिदान केलं, जे शहीद झाले त्यांच्या मेहनतीवर आपण पाणी टाकायला नको. कोविड योद्ध्यांचा सगळीकडे सत्कार सुरू आहे. आनंद आहे. पण सत्कार करताना किमान एक भावना अशी हवी की आणखी कोविड योद्धे निर्माण करण्याची गरज लागायला नको.

आपण कोविड योद्धे नाही झालात, तरी कृपा करून दूत होऊ नका. एकीकडे कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा ते उघडा म्हणायचं, असं नको. सामाजिक भान ठेवा. हे युद्ध जिंकण्यासाठी आपण जे करता येईल ते करायला हवं.

आधी दोन- अडीच हजार रूग्ण असायचे. त्यात आता तेवढीच भर पडायला लागली आहे. हे फार विचित्र आहे. आज अमरावतीमधे हजाराच्या आसपास रूग्ण आहेत. तेव्हाच्या प्रमाणात किंवा त्याच्या जवळपास आता रुग्ण सापडत आहेत. आज गलथानपणा केला, तर आकडेवारी किती वाढेल, याची मला चिंता आहे.

आधी रुग्ण आणि आरोग्य सुविधांचं प्रमाण विषम होतं. पण तेव्हाचा जो पिक होता, जे सर्वोच्च शिखर होतं, तिथपासून आता सुरुवात झाली तर आरोग्यव्यवस्थेवर किती ताण येईल. मंत्रिमंडळातले आमचे सहकारीही बाधित होत आहेत. राजेश टोपे जी, जयंत पाटील जी बाधित आहेत. सुदैवाने यशोमती ताई नेगेटिव्ह आल्या.

दोन अडीच हजारांवरून आज महाराष्ट्रात ६९७१ रुग्णसंख्या झाली आहे. मुंबईत जी संख्या ४०० च्या आसपास होती, ती आता ८००-९०० वर गेली आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती म्हणजे तर दुसरी लाट आली आहे का? ती दारावर धडका मारतेय. आली की नाही हे पंधरा दिवसांत कळेल.

उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक मिरवणूका, मोर्चे, आंदोलनं- गर्दी होणारी आणि मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांची बंदी घातली जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली, तेव्हा आपण घरात होतात. आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर ते अवघड आहे. आता सगळे घराबाहेर आहेत. अशा वेळेस मग या यंत्रणेवर किती ताण द्यायचा. एकाच यंत्रणेवर ताण टाकून आपण बेभान वागायचं हा अमानुषपणा आहे.

मला असं वाटतं, की माझे कुटुंब जशी मोहीम राबवली आणि यशस्वी केली, तशी आता नवी मोहीम सुरू करायला हवी, की मी जबाबदार. प्रत्येकानं मास्क घालायाचा, हात धुवायचे, सगळे सॅनिटाययझर विसरायला लागले आहेत. ते वापरायचं, अंतर ठेवायचं.

लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर आठ दिवसांत मिळेल. आठ दिवस मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको, ते मास्क घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं अशा गोष्टी पाळतील. बघूया किती जणांना लॉकडऊन हवा आणि किती जणांना नको आहे ते.

मास्क घाला, लॉकडाऊन टाळा

शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

 


Popular Posts

Major Accident Averted in Mulund West — Huge Tree Branch Breaks Outside Veena Nagar Gate, No Casualties Reported

  मुलुंड पश्चिम में बड़ा हादसा टला, मुलुंड पश्चिम वीणा नगर गेट के बाहर में पुराने वृक्ष की विशाल शाखा टूटी , कोई जानहानि नहीं मुलुंड पश्चिम ...