Thursday, May 9, 2024

Reflecting Reality Lok Sabha Candidates' Campaign Missteps Part 2

Reflecting Reality Lok Sabha Candidates' Campaign Missteps Part 1

संविधान वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव करावा लागेल – नितिन बानुगडे


 https://www.facebook.com/share/v/GCPcsncobjCKMtNH/?mibextid=xfxF2i

मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) – जगातील हे पहिले उदाहरण असेल ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचाच पक्ष व चिन्ह घेऊन त्यांच्याच विरोधात निवडणुक लढवली जात आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे गुण्यागोविंदाने भाजप मध्ये नांदत असून गरीब आणखीन गरीब होत चालला आहे. तर शेतक-यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी थांबण्याचे नाव घेत नाही. अशा भाजपला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे. अशी जोरदार टीका शिवसेनेच्या उपनेत्या, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
भाजप मध्ये प्रामाणिकपणे काम करणा-यांना काहीच दिले जात नाही. मात्र बाहेरुन येणा-या अशोक चव्हाण सारख्या नेत्यांना राज्यसभा दिली जाते. 70 हजार कोटींचा घोटाळा करणारे गुण्यागोविंदाने भाजपात राहत असून गद्दारांना मोठ मोठी पदे देऊन पक्षात घेतले जात असल्याचे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.
 
यावेळी शिवसेनेचे उपनेते नितिन बानुगडे पाटील यांनी भाजपवर खरमरीत टीका करुन त्यांचे वस्रहरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आता राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत नसून तो मतपेटीतून येत आहे. लोकांना त्यांच्या मतांची किंमत कळेल तेव्हा तो राजा असेल. पुर्वी मतदारांना पळवुन नेले जात होते. आता तर आमदार, खासदार व पक्षच पळवुन न्यायला लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण देशभर चालू असून शिवसेना राष्ट्रवादी फोडून लोकशाहीचे चिरहरण करण्यात आले. देशाचे संविधान लोकांच्या हातात असे पर्यंत ते सुरक्षित असून लोकांना आता कितपत सुरक्षित ठेवायचे आहे ते त्यांच्या हातात आहे. मोदींनी व्यापा-यांचे 14 लाख कोटी रुपये माफ केले. मात्र गरीब शेतक-यांचे कर्ज त्यांना माफ करता आले नाही. शेतकरी रोज आत्महत्या करीत असून गेल्या काही वर्षात अडीच हजार शेतक-यांनी कर्जापोटी आत्महत्या केल्या आहेत. निवडणुका आल्या की हिंदु मुस्लिम, भारत पाकिस्तान या विषयांना पुढे केले जाते. तर विरोधकांनी सत्तर वर्षात काय केले त्याचा हिशोब मागितला जातो. मात्र तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगीतले जात नाही. कॉंग्रेसने सत्तर वर्षात केले म्हणुन तर तुम्ही ते विकत आहेत ना असा टोलाही बानुगडे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले दहा वर्षापुर्वी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला होता. काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील. लोकांना मोफत घरे दिली जातील. वर्षाला दोन कोटी तरुणांना नोक-या दिल्या जातील. शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यात येतील. त्यांचे उत्पन्न दुप्पट केले जातील. मात्र यापैकी काहीही झालेले नाही. नमामी गंगे, स्वच्छता अभियान, मेड इन इंडिया या सारख्या सर्व योजना फसल्या असून आता जनता त्यांच्या गॅरेंटीला फसणार नाही. चंदीगड मध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली ते सा-या देशाने उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असे पर्यंत महाराष्ट्रातील एकही उद्योग गुजरातला जाऊ दिला नाही. महाराष्ट्रातील हे सर्व उद्योग गुजरातला नेण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले. त्यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री करुन राज्यातील 16 उद्योगधंदे गुजरातला नेले. जीएसटी मुळे आता देशातील सर्व व्यापारी वैतागले असून कॉंग्रेसने 70 वर्षात 55 लाख कोटींचे कर्ज देशावर केले होते तर भाजपने केवळ 10 वर्षात दोनशे पाच लाख कोटींचे कर्ज देशावर केले आहे. इतके कर्ज घेऊन विकास कुठे केला. हा पैसा गेला कुठे असा सवाल बानुगडे यांनी केला.
 
मुंबई ज्यांच्या हक्काची आहे त्या मराठी माणसांनाच आता इमारतींमध्ये प्रवेश नाकारला जातो. गुजराती वस्ती असलेल्या ठिकाणी घर, दुकान घेऊ दिले जात नाही. भाजपकडे आता काहीही करण्यासारखे राहीले नाही म्हणुन ते आता मराठी गुजराती वाद निर्माण करीत आहेत. त्यामुळे आता शेवटची संधी असून या देशाला महासत्ता करायचे आहे की हुकुमशाहांच्या हातात द्यायचे आहे ते लोकांनी ठरवावे. त्यासाठी या निवडणुकीत भाजपचा पराभव करावाच लागेल असेही बानुगडे यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले, मोदी सांगतात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मग त्या मणीपुर मध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यावेळी या सरकारने काय केले. गेल्या काही वर्षात या देशात चार लाख महिला गायब झाल्या आहेत. लाखो मुले शिक्षणापासुन वंचित राहत असून हि गळती थांबविण्यासाठी या सरकारने काय केले. रोज 12 शेतकरी तर 2 बेरोजगार तरुण आत्महत्या करीत असून सरकारने त्यांच्यासाठी काय केले. असे सवालही त्यांनी केले. ईशान्य मुंबईत गेल्या दहा वर्षात काय काम केले हे भाजपने दाखवुन द्यावे. त्यामुळे हि निवडणुक गद्दारां विरुद्ध निष्ठावंत असून लोकांना लोकशाही पाहिजे की हुकुमशाही हा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. चारशे पारचा नारा देणा-यांना आता देशाचे संविधान बदली करुन त्यांना त्यांचे संविधान आणायचे असल्याचेही बानगुडे यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले.
 
यावेळी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितले की भाजपकडे आता काहीही मुद्दा नसल्याने ते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान करायला लागले आहेत. लोकांना काहीही कारण नसतांना या मुद्द्यांवरुन उसकवण्याच प्रयत्न केला जातोय. त्यामुळे लोकांनी शांत राहून मतपेटीतून त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवावी.

Popular Posts