Friday, May 10, 2024

Demand to suspend verified, official social media accounts of Mihir Korecha and BJP4Mumbai

महत्त्वाची बातमी





भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात संजय पाटील यांची निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार





उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि मुंबई भाजपचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट BJP4Mumbai यांच्यावर हिंदू विरुद्ध मुस्लिम, तसंच मराठी विरुद्ध गुजराती अशी तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मिहिर कोटेचा यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरही निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित संबंधित सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावीत अशीही मागणी संजय पाटील यांनी केली आहे. 



श्री. संजय पाटील यांचे संपूर्ण पत्र पुढीलप्रमाणे : 👇

 दिनांक ८ मे २०२४

 

प्रति,

मा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त,

निर्वाचन सदन, अशोक रोड,

नवी दिल्ली ११०००१,

 

मा. पोलीस आयुक्त,

पोलीस आयुक्तालय,

महात्मा फुले मंडई, फोर्ट,

मुंबई ४००००१

 

मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.

सामान्य प्रशासकीय इमारत, सहावा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०००३२

 

मा. निवडणूक निर्णय अधिकारी,

२८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ,

महापालिका इमारत, विक्रोळी (पूर्व), मुंबई.

 

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

 

विषय : भारतीय जनता पक्षाचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai या सोशल मीडिया अकाउंट विरोधात खोटी माहिती पसरवणे, दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणे व इतर गंभीर कृत्यांबाबत तक्रार अर्ज.

 

महोदय,

 

मी, संजय दिना पाटील, शिवसेना - महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai हे सोशल मीडिया अकाउंट यांच्याकडून काही अत्यंत आक्षेपार्ह, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गोष्टी सातत्याने घडविल्या जात आहेत. सदर पत्राद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की,

 

१) दिनांक ५ मे रोजी सायंकाळी उशिरा शिवसेनेची प्रचार पत्रके वाटण्यासाठी महविकास आघाडीचे काही कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम येथील समर्पण या गुजरातीबहुल सोसायटीत जाऊ इच्छित होते. मात्र सोसायटीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रवेश करण्यास मज्जाव केला. अखेर तिथे बाचाबाची झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याबाबतचे व्हिडिओ, बातम्या मी या पत्रासोबत देत आहे. [EXHIBIT-A]

 

२) दिनांक ४ मे रोजी उत्तर पूर्व मुंबईत माझ्याच नावाच्या ४ डमी उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. या चारही उमेदवारांचे affidavit एकाच व्हेंडरकडून, एकाच दिवशी, एकाच व्यक्तीने, एकाच स्वाक्षरीने घेतले. याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या चारही डमी उमेदवारांचे संबंधित affidavit मी सोबत जोडत आहे. या ४ डमी उमेदवारांपैकी २ जणांचे अर्ज पडताळणी प्रक्रियेत बाद झाले असले तरी आजही २ डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  [EXHIBIT-B]

 

३) दिनांक ३ मे रोजी प्रचार करत असताना मी स्वतः वृत्तवाहिन्यांशी बोलताना "आप मशाल का बटण दबाके उनको (द्वेषभावना पसरवणाऱ्यांना) खतम कीजिए"असं आवाहन केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ४ मे रोजी भाजपच्या BJP4Mumbai या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक आणि X अकाऊंटवरून "उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का?" असा सवाल उपस्थित करणारे ग्राफिक प्रकाशित करण्यात आले आहे. संबंधित पोस्ट आजही भाजपच्या या व्हेरीफाईड पेजवर उपलब्ध आहे. माझा आक्षेप आहे की, भाजपची अधिकृत सोशल मीडिया टीम माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. इतकंच नव्हे तर, आमचे आदरणीय नेते, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हिंदुद्वेष्टे म्हणून दाखवून त्यांची वैयक्तिक बदनामी करत आहे. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटचा वापर अगदी निर्लज्जपणे आणि उघडपणे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी केला जातोय. सोबत या मुद्द्याचे पुरावे सोबत जोडत आहे. [EXHIBIT-C]

 

४) सर्वात गंभीर बाब म्हणजे, १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांनी एक व्हिडिओ स्वत:च्या फेसबुकवर पोस्ट केलाय, ज्यात ते म्हणतात की, "मी संजय पाटलांच्या टोपीवाल्या गुंडांना (म्हणजे मुसलमान नागरिकांना) ओपन चॅलेंज करतो की उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे. हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा, पाठीमागून नाही." तसंच, श्री. मिहिर कोटेचा यांनी कोणतेही कारण नसताना मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज नगरचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान' असाही केला! संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ आजही त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आहे. सोबत पुरावे जोडत आहे. [EXHIBIT-D]

 

५) दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारसभेवर "दगडफेक झाली नसून विटेचा तुकडा रॅलीच्या दिशेने आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तक्रार नोंदवून घेत आहोत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येईल. याप्रकरणी अधिक चौकशी करत असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. हेमराजसिंग राजपूत यांनी सांगितल्याची बातमी दैनिकात प्रकाशित झाली असून तीसुद्धा या पत्रासोबत जोडत आहे. [EXHIBIT-E]

 

उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून मराठी विरुद्ध गुजराती हा वाद आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम यांच्यात वाद भडकून येथील शांतता भंग पावेल आणि दोन समाजांत तेढ निर्माण होईल असा प्रचार सातत्याने केला जात आहे. या संदर्भातील सर्व पुरावे मी या पत्रासोबत जोडत आहे.

 

माझी आपणास विनंती आहे की, भारतीय जनता पक्ष, त्यांचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि त्यांचे सर्व संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स यांविरोधात तसंच विशेषत: BJP4Mumbai या फेसबुक पेजवर आणि एक्स अकाउंटवर निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित ही सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावेत. संबंधित सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंद करावा, ही विनंती.

 

धन्यवाद.

 

आपला विश्वासू,

संजय दिना पाटील

अधिकृत उमेदवार,

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे





No comments:

Popular Posts